Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

विभागांतर्गत 25 टक्केच बदल्या

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबतीत बदल केला आहे. या बदलानुसार विभागनिहाय कार्यरत असलेल्या २५ टक्केच बदल्या करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार सर्वसाधारण बदली प्रक्रिया ही येत्या नऊ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

बदली प्रक्रियेत बदल

राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात आला नसल्याने आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून चालू आर्थिक वर्षातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. याबाबतच्या आदेशाची प्रत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे.

बदली भत्त्यापोटी होणारा खर्च टाळण्यासाठी आदेश

दरम्यान, राज्य सरकारने याआधी येत्या १४ आॅगस्टपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश दिला होता. तो आदेश रद्द करत, आता ही मुदत ९ आॅगस्ट केली आहे.

Advertisement

सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया संपल्यानंतर १० ते ३० आॅगस्ट या कालावधीत संवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी विशेष कारणास्तवच्या बदल्या कराव्यात, असा आदेश कुलकर्णी यांनी दिला आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी बदली भत्त्यापोटी होणारा खर्च टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सेवाज्येष्ठतेचा निकष लावणार

या बदल्या संवर्गनिहाय असलेल्या सेवा ज्येष्ठतेच्या आधारे केल्या जाणार आहेत. यानुसार ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकाच विभागात किंवा तालुक्यात सर्वाधिक काळ सेवा झाली आहे, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे.

Advertisement

त्याच्या आधारे पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

 

Advertisement
Leave a comment