दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच खरेदी करुन सोनं दसऱ्याच्या दिवशी ते प्रथा म्हणून घरात आणण्याचा विचार अनेकजण करत असतील.

अशा लोकांसाठी आज योग्य संधी आहे. कारण, गुरुवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वर जाण्यापूर्वी खरेदीसाठी आता योग्य वेळ आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या भावात 0.20 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,819 रुपये इतका झाला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.51 टक्क्यांची घसरण होऊन चांदीचा प्रतिकिलो दर 62,564 रुपयांवर पोहोचला आहे.

Advertisement

गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 8381 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर वाढेल.

अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.

पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

 

Advertisement