संत तुकाराम महाराजांनी ज्या भंडारा डोंगरावर वास्तव्य केले, त्या भंडारा डोंगरातून प्रस्तावित रिंगरोड जात असताना तिथे बोगदा काढण्याचा प्रस्ताव आहे.

या बोगद्याला विरोध होत आहे. धार्मिक आणि श्रद्धेचा विषय असल्याने त्याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

भावना दुखावणार नाही़

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात असल्याचे नकाशामध्ये दर्शविले आहे.

Advertisement

डोंगराला बोगदा करण्याच्या मुद्यावरून नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक झाली. ‘‘योग्य मार्ग काढला जाईल. श्रद्धास्थानाच्या बाबतीत वारकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची भावना दुखावली जाणार नाही, असे बैठकीत शिंदे यांनी सांगितले.

रिंगरोडच्या रेखांकनात बदलाची मागणी

मावळातील वारकरी संप्रदायाने रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबईत बैठक झाली. मंत्री एकनाथ शिंदे, खासदार खासदार श्रीरंग बारणे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, की श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अत्यंत पवित्र असे ठिकाण आहे.

Advertisement

भंडारा डोंगरास महाराष्ट्र सरकारने तीर्थ क्षेत्र घोषित करून तेथे विविध विकासकामे केली आहेत. हे स्थान श्री क्षेत्र देहू या संस्थानपासून जवळ आहे. त्यामुळे तेथे महाराष्ट्रातून व देश-विदेशातून पर्यटक दर्शनासाठी येतात.

देहू संस्थानचाही विरोध

श्री क्षेत्र भंडार डोंगराला बोगदा करण्यास वारक-यांचा व संस्थानचा विरोध आहे. प्रस्तावित रिंगरोड श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून जात आहे. त्यासाठी डोंगराला बोगदा पाडावा लागत असल्याचे नकाशात दिसून येत आहे.

त्याला वारकरी, सांप्रादाय क्षेत्रातील नागरिकांचा मोठा विरोध आहे. त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘यातून योग्य मार्ग काढला जाईल. श्रद्धास्थानाच्या बाबतीत वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची भावना दुखावली जाणार नाही.’’

Advertisement