पुणेः पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम होणे आवश्यक असताना महापालिकेने ते केले नाही. राडारोडाही उचलला नाही. त्यामुळे विरोधकांनी महापालिका प्रशासन व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले.

सव्वा वर्षानंतर प्रत्यक्ष सभा :- सुमारे सव्वा वर्षानंतर महापालिकेची सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. या सभेत नालेसफाईचा मुद्दा गाजला. नालेसफाईची मागणी करणारे फ्लेक्स विरोधकांनी सभागृहात आणले होते.

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल धनवडे आदींनी नालेसफाईची कामे अपूर्ण असल्याचे सांगून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

Advertisement

महापाैरांचे आदेशही दुर्लक्षित :- महापौरांनी नुकतीच शहरातील काही नाल्यांची पाहाणी केली. ‘१८ जून उलटूनही शहरातील नालेसफाई झालेली नाही. यंदा या कामांना इतका उशीर का झाला, याचे उत्तर सत्ताधारी आणि प्रशासनाने द्यावे,’

अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली. ‘महापौरांनी भेट दिलेल्या नाल्यांचीच सफाई झाली आहे, उर्वरित नाल्यांची सफाई बाकी आहे,’ असा आरोप अरविंद शिंदे यांनी केला.

नालेसफाई पूर्ण करण्याचे आश्वासन :- यंदा नालेसफाईच्या कामाला उशीर झाला असला, तरी ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचा सतत आढावा घेतला जात आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

Advertisement