Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षणाच्या प्रश्नावर खोटे बोलत आहेत

इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या विषयावर काँग्रेस आणखी आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षणाच्या प्रश्नावर खोटे बोलत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचं आज राज्यव्यापी आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षनेते आरक्षणाच्या प्रश्नावर खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून उद्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्रामुळे आरक्षण संपुष्टात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली. केंद्राच्या धोरणावर पटोले यांनी जोरदार टीका केली.

‘सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती; परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे,’ असा आरोप पटोले यांनी केला आहे.

आरक्षण संपविण्याचा घाट

‘आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे.

देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली; पण केंद्राने तो दिला नाही.

केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

Leave a comment