मुंबई महापालिकेने विविध प्रकल्पांसाठी ७ हजार ८८४ कोटी रुपयांचा निधी स्वतंत्रपणे उभारण्यासाठी ‘विशेष निधी’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी सर्वसाधारण आणि पाणी अर्थसंकल्पातून प्रत्येकी दोन हजार कोटी असे एकूण चार हजार कोटी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास काँग्रेस आणि भाजपने विरोध केला आहे.

निधी वळविण्यास काँग्रेस, भाजपचा आक्षेप

पालिकेला शहर व उपनगरात रेल्वेमार्गावर बारा पुलांची बांधणी, नवीन पाणी प्रकल्प, मिठी नदी अन्य नद्यांचे पुनरुज्जीवन, नाल्यांची सफाई, पूरस्थिती रोखण्यासाठी उपाययोजना यासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तब्बल ७ हजार ८८४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

Advertisement

त्यासाठी अर्थसंकल्प ‘अ’मधून दोन हजार कोटी आणि अर्थसंकल्प ‘ग’ अंतर्गत दोन हजार कोटी असा एकूण चार हजार कोटींचा निधी संचित वर्ताळयामधून (सरप्लस) वर्ग करणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव मागील आठवड्यात स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. विरोधक हा प्रस्ताव अडवण्याची शक्यता असल्याने राखून ठेवण्यात आला होता.

पालिकेची तिजोरी रिकामी होण्याची भीती

या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिकेने विविध प्रकल्पांच्या नावाखाली ‘विशेष निधी’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी संचित वर्ताळयामधून पैसे वर्ग करणे चुकीचे आहे, असे सांगितले.

Advertisement

पालिकेच्या विविध बँकांत ८० हजार कोटींच्या ठेवी असून त्यातील साडेचार हजार कोटी रुपये कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्यात आले आहेत. ३० हजार कोटी रुपये पालिका कर्मचाऱ्यांची देणी आहेत.

३२ हजार कोटी कंत्राटदारांच्या अनामत रकमा आहेत. उर्वरित २० हजार कोटी निधीतून आणखी चार हजार कोटी काढले, तर पालिकेची तिजोरी रिकामी होईल, अशी भीती राजा यांनी व्यक्त केली आहे.

 

Advertisement