” ‘व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपबाबत संबंधित महिला पोलिस उपायुक्तांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल,” अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

क्लिप ही गंभीर बाब

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना उपाययोजनासंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील एका महिला पोलिस उपायुक्ताने कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलमधून बिर्याणी आणण्यासाठी पैसे कशाला द्यायचे, अशा आशायाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

या संदर्भात विचारले असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, ‘मीसुद्धा ही क्लिप ऐकली असून, ही बाब निश्चितच गंभीर आहे. याबाबत चौकशी करून अहवाल द्यावा, असे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर राज्य सरकार त्याबाबत योग्य तो निर्णय घेईल.’

Advertisement

फोन टॅपिंगचे आदेश तत्कालीन सरकारकडून

‘पोलिस दलात बदली आणि बढतीबाबत कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. त्याची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसारच फोन टॅपिंग करण्यात आले,’ अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात नुकतीच दिली आहे.

या संदर्भात विचारले असता, वळसे पाटील म्हणाले, ‘फोन टॅपिंग प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर आता बोलणे उचित होणार नाही; परंतु फोन टॅपिंगचे आदेश तत्कालीन सरकारच्या कालावधीतील आहेत.’

 

Advertisement