महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सर्वळ्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही 48 तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्राचा आदेश
राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात महापुराने थैमान घातलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला आदी भागात पावसानं हाहा:कार माजवला आहे.
महापुरामुळे राज्यात विविध भागात शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भरपाई निश्चित करण्याच्या सूचना
वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्याचे आदेश राज्याच्या कृषी विभागानं दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई निश्चित करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारची मदत
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून अनेक मृत्यू झाले.
या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.