Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

सहकारी संस्थांच्या सभा ऑनलाईन घेण्याचा आदेश

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात याव्यात, तर ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांनी वार्षिक सभेचे आयोजन मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे करावे, असे आदेश सहकार विभागाने जारी केले आहेत.

सभांबाबतचा संभ्रम दूर

प्रत्येक सहकारी संस्थने वित्तीय वर्ष संपल्यापासून चार महिन्यांच्या कालावधीत लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांत वार्षिक सभा बोलावण्याची तरतूद आहे; परंतु राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे ५० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे.

त्यामुळे २०२०-२१ मधील वार्षिक सर्वसाधारण सभा कशा घ्याव्यात, याबाबत सहकारी संस्थांमध्ये संभ्रमावस्था होती. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने आदेश जारी केले आहेत.

Advertisement

सहकारी संस्थांच्या ऑनलाइनद्वारेच सभा

५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी व्हीसीद्वारे वार्षिक सभेचे आयोजन करावे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

संस्थेच्या प्रत्येक सभासदाला वार्षिक सभेची तारीख, वेळ, ठिकाण आणि लिंक याची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस, इ-मेल किंवा व्हॉटसअपद्वारे कळविण्यात यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावण्यात यावी.

ज्या सभासदाने इ-मेल पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल, अशा सभासदांना सात दिवसांत पत्राद्वारे माहिती पोच करण्यात यावी. सर्व सहकारी संस्थांनी वार्षिक सभेच्या माहितीची जाहिरात एका स्थानिक वर्तमानपत्रात द्यावी.

Advertisement

सभासदांनी इ-मेल किंवा मोबाईल क्रमांकाची सहकारी संस्थेकडे नोंद केली नसल्यास ती माहिती कोठे देणार, याबाबत सभासदांना माहिती द्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

 

Advertisement
Leave a comment