एकाच दिवसांत तीन ठिकाणी इमारत दुर्घटना घडल्या. त्यात २५ बळी गेले. मुंबईत अजूनही चार-पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हे लक्षात घेऊन धोकादायक इमारतीतील नागरिकांचे सक्तीने स्थानांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सावधगिरी बाळगा

मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या.

प्रशासनाने धोकादायक इमारत पालिकेची असो की म्हाडाची; नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून स्थलांतरीत करावे, असे आदेश त्यांनी दिले.

“मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी. समन्वयाने काम करावे,” असे निर्देश ठाकरे यांनी दिले.

अनपेक्षित दुर्घटना न घडण्याची दक्षता घ्या

ठाकरे म्हणाले, “दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले, तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या.

चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीवरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली. ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे.

गेल्या वर्षीदेखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत. त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे.

काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्र बंद पडल्याची घटना घडली. हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी.”

रात्रीही पाणी उपसा सुरूच राहावा

“पावसाचा जोर रात्री वाढतो आहे, हे 9 जून आणि आत्ता काल (17 जुलै) झालेल्या पावसाने लक्षात आले आहे. हे पाहता रात्रीदेखील पाणी उपसा करणारी यंत्रणा कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे.

पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते.

त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून स्थलांतरित करा,” असे आदेश ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.