कोणताही माणूस जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याच्या हातून एखादा गुन्हा घडतो. शिक्षा भोगताना त्यांना पश्चाताप होतो. हातची कलाकुसर नेहमी कामाला येते.

कारागृहातही अशी कला रोजगार मिळवून देत असते. पुण्याच्या येरवडा कारागृहातही पैठण्या घडविण्यात असे हात गुंतले आहेत.

बारा पैठण्या तयार

येरवडा कारागृहात तयार केलेल्या ‘हँडमेड’ पैठण्यांना बाजारात चांगलीच मागणी आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत दोन कैद्यांनी एकूण बारा पैठण्या तयार केल्या असून, याच्या विक्रीतून कारागृहाला एक लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Advertisement

सुबक नक्षीकाम, रंग संगतीवरून ठरते काम

येरवडा कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी यंत्रमाग, धोबीकाम, रंगकाम, चर्मकला, कागदकाम यांसोबतच पैठणीची निर्मिती करतात. सुंदर आणि आकर्षक नक्षीकाम ही येथील पैठणीची विशेष ओळख आहे.

शिवणकाम व विणकाम विभागांत पैठणी साडी तयार करण्याचे काम केले जाते. पैठणी तयार करण्यासाठी रेशीम वापरले जात असून, हे काम नाजूक असते. जरीच्या काठावर नक्षीकाम करण्यात येते. त्यामुळे प्रशिक्षित कैदीच पैठणीचे काम करतात.

कारागृहातील केवळ दोन कैद्यांना पैठणी साडी तयार करण्याचे काम येत असून, सुबक नक्षीकाम, रंग-संगतीवरून या साडीची किंमत ठरली जाते.

Advertisement

ऑर्डर मिळाल्यावरच साड्या तयार

बाजारात यंत्रावर तयार होणारी पैठणी दहा हजारांपासून काही लाखांपर्यंत विकली जाते. येरवडा कारागृहातही बाजारात मिळणाऱ्या दर्जाप्रमाणेच पैठणीची निर्मिती केली जाते; मात्र कारागृहात तयार होणाऱ्या पैठणीला कामगार खर्च अत्यंत कमी असल्याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत येथील पैठणीची विक्री होते.

पैठणीची ऑर्डर आल्यावरच साडी तयार केली जाते. इतर विभागांतील कैद्यांप्रमाणेच पैठणी तयार करणाऱ्या कैद्यांना ६७ रुपये पगार मिळतो.

ब्रोकेज पैठणी तयार करण्यासाठी दोन महिने

‘ब्रोकेज’ नावाची पैठणी तयार करण्यासाठी दोन कैद्यांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. साधारण पैठणी तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो.

Advertisement

‘ब्रोकेज’ पैठणी तयार करणे खर्चिक असल्याने ग्राहकांकडून मागणी आल्यावरच याची निर्मिती केली जाते. एक पैठणी तयार करायला वीस हजार रुपये खर्च येतो.

पैठणी तयार करणाऱ्या दोन कैद्यांपैकी एका कैद्याची मुक्तता झाल्याने सध्या एकच कुशल कैदी पैठणी तयार करण्याचे काम करीत आहे.

पैठणीची वाढती मागणी लक्षात घेता प्रशासनाने आणखी एका कैद्याची निवड केली आहे, अशी माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली.

Advertisement

पैठण्यांची विक्री

२०२०-२१ मध्ये तयार करण्यात आलेल्या १२ पैठण्यांपैकी दहा पैठण्या प्रत्येकी साडेनऊ हजार या प्रमाणे विकल्या गेल्या.

यातून ९५ हजार रुपये, तर दोन पैठण्या प्रत्येकी वीस हजार रुपयांना विकल्या गेल्या. यातून ४० हजार असे एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न कारागृह प्रशासनाला मिळाले आहे.

 

Advertisement