ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

परमबीर सिंहांना हवा आणखी वेळ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आता ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहेत. त्यांनी ईडीच्या समन्सला उत्तर देताना वेळ मागितला आहे.

तब्येतीचे कारण सांगून चौकशीला गैरहजर

देशमुख यांनी शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यासंबंधी पैशांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) तपास करीत आहे.

त्यामध्येच परमबीर यांची चौकशी करून त्यांचा जबाब ‘ईडी’ला हवा आहे. त्यासाठीच त्यांना सोमवारी चौकशीसाठी समन्स बजावले होते; परंतु त्यांनी चौकशीला उपस्थित न राहता ‘ईडी’ला उत्तर पाठवले.

मागील काही दिवसांपासून तब्येत बरी नाही. त्याचवेळी लवकरच आपल्याला एक शस्त्रक्रियादेखील करायची आहे. त्यामुळेच चौकशी व जबाब नोंदवण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असे त्यांनी यात नमूद केले आहे.

बारमालकांची यादी सोपवून खंडणी

दरम्यान, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याची ‘ईडी’ने चौकशी केली आहे. ‘अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत आपण होतो.

तेथे देशमुख यांनी काही बारमालकांची यादी आपल्याला सोपवली. त्यांच्याकडून खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आले’, असे वाझेने जबाबात म्हटले असल्याचे ‘ईडी’तील सूत्रांनी सांगितले.

तपास अंतिम टप्प्यात?

याप्रकरणी ‘ईडी’ला आवश्यक असलेली चौकशी जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक अटकेत आहेत.

वाझेचादेखील जबाब नोंदवण्यात आला आहे. आता केवळ देशमुख व परमबीर यांचा जबाब नोंदवणे व चौकशी बाकी आहे. त्यामुळेच हा तपास अंतिम टप्प्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

You might also like
2 li