चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्येत ३७ हजार ३१७ ने वाढ झाली आहे.
यामुळे यंदा पटसंख्येच्या बाबतीत जिल्हा परिषद शाळांना सुगीचे दिवस आले आहेत. परिणामी शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोकाही कमी झाला आहे.
खासगी शाळांवर संक्रांत
कोरोनामुळे आर्थिक ताणाताण आलेल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण देण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
परिणामी खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाल्याने, कोरोनामुळे या खासगी शाळांवर संक्रांत आल्याची भावना जिल्हा परिषदेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
खासगी शाळा विद्यार्थ्यांच्या शोधात
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी वाढल्याने आता शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत. शिवाय अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची दुसरी शाळा मिळण्यासाठी होणारी धावपळही थांबू शकणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढल्याने, कधी नव्हे ते यंदा खासगी शाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
अंगणवाडीतून थेट जिल्हा परिषद शाळेत
जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा थेट अंगणवाडीतून जिल्हा परिषदेच्या शाळेत हा अनोखा प्रयोग राबविला होता.
या प्रयोगानुसार पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र असलेल्या अंगणवाडीमधील सर्व बालकांच्या याद्या आपापल्या गावातील जिल्हा परिषद शाळांकडे देण्यात आल्या होत्या.
या याद्यांनुसार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेत, या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण केले आहेत.