ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पटोले यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका

महाविकास आघाडीत कितीही वाद नसल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी एकही दिवस विसंवादाविना जात नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा लावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

महाविकास आघाडीत तणाव वाढणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन शिवसैनिकांना कामाला लागा, असा आदेश देतात ते चालते आणि मी स्वबळावर बोललो, की त्यांना त्रास होतो, हे योग्य नाही, असे नमूद करत स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे, असे पटोले यांनी लोणावळा येथे कार्यकर्ता मेळाव्यात ठणकावून सांगितलं.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही पटोले यांनी गंभीर आरोप केला. पटोले यांनी उघडपणे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना लक्ष्य केल्याने येत्या काळात महाविकास आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सोबत राहून सुरा खुपसायचा हे चालणार नाही

पटोले हे स्वबळावर अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या संदेशाचा उल्लेख करतच निशाणा साधला.

समझोता करायचा नाही आणि सोबत राहून सुरा खुपसायचा असेल तर ते चालणार नाही. याबद्दल जो काही राग आपल्या मनात आहे, ती एक ताकद बनली पाहिजे, असे आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढल्या पाहिजेत, या म्हणण्यावर मी ठाम आहे. आता माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करीत नाहीत

शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसलाही पटोले यांनी लक्ष्य केले. पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत.

यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो; पण शेवटी त्यांचं ऐकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात. कोणत्याही समित्यांवर नावे पाठवायची असतील, तर तिथे संपर्कमंत्र्यांची नाही तर पालकमंत्र्यांची सही लागते.

ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपली ताकद कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन पटोले यांनी केले.

 

You might also like
2 li