राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खास शैली आहे. कधी ते सणसणीत समाचार घेतात.
कधी अनुल्लेखाने मारतात, तर कधी टीका करणार नाही, असं म्हणताना एकच वाक्य असं वापरतात, की त्यांनी टीका केली असती, तरी बरे झाले असते, असे ते ज्यांच्याबाबतीत बोलले त्यांना वाटत असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांनी असाच खास शैलीत समाचार घेतला.
पटोले यांनी लोणावळ्यात बोलताना एकत्र राहायचे आणि पाठीत सुरा खुपसायचे हे आपल्याला मान्य नाही, अशी टीका केली होती. ही टीका अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करीत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती.
त्याबाबत शरद पवार यांना विचारणा करता, ‘नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हणत टोला लगावला आहे. बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.
सोनिया गांधी बोलल्या असत्या, तर…
जर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या, तर मी बोललो असतो, ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? या गोष्टीत मी पडत नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
काय म्हणाले होते पटोले ?
लोणावळ्यातील मेळाव्यात बोलताना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो, मग मी बोललेलं का खुपतं?
असा सवाल त्यांनी केला होता. तसेच त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुण्याचे पालकमंत्री आपलं काम करत नाहीत. त्यामुळे पुण्यातील पालकमंत्री आपलाच होईल अशी शपथ घ्या, असं ते म्हणाले.
आपण काही बोलायचं नाही; पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर म्हणालो होतो, यावर मी माघार घेणार नाही. त्याच्यामुळे आपण कामाला लागा.
आपला माणूस खूर्चीवर बसायला हवा, असं पटोले म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच…
आमचा तीन पक्षांचा निर्णय झालाय. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही.
आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं पवार म्हणाले. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही.