गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बारामतीती ओबीसींचा महामेळावा घेणार असून, त्यांची तोफ तिथे कशी धडाडणार, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

२९ तारखेला महामेळावा

ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि आपल्या इतर मागण्यांच्या संदर्भात बारामती येथे ओबीसी समाजाचा एक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

येत्या 29 जुलै रोजी हा महामेळावा होणार असून त्या मेळाव्यात पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

या मेळाव्यासाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

पटोले यांच्या वक्तव्याकडे लक्ष

बारामतीत ओबीसींचा हा महामेळावा होत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला होता आणि त्यानंतर आता पटोले हे बारामतीत दाखल होणार आहेत.

हा ओबीसींचा महामेळावा असला तरी या मेळाव्यात पटोले काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement

बारामती केंद्रशासित आहे का ?

बारामती येथील महामेळाव्याच्या संदर्भात पटोले म्हणाले, की बारामती केंद्रशासित भाग नाही, ओबीसी मेळावा तिथे आयोजित केला म्हणून तिथे जात आहे. त्यावरून वेगळा अर्थ काढू नये.

थोरात उपस्थित राहणार

या महामेळाव्याच्या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी म्हटले, की बारामती येथे ओबीसी महामेळावा आहे; पण तो केंद्र सरकारच्या विरोधात आहे. बारामती आहे म्हणून वेगळा अर्थ काढायला नको.

29 जुलै रोजीच्या या मेळाव्याला मी स्वत: उपस्थित राहणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात हा मोठा मेळावा होणार आहे.

Advertisement

संविधानात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अधिकार ओबीसी समाजाला दिले आहेत, ते डावलण्याचे काम होत आहे ते आम्ही सहन करणार नाही.

म्हणून ज्या पद्धतीने एक भव्य मेळावा बारामतीत आयोजित करण्यात आला आहे तेथे मी उपस्थित राहणार आहे.

 

Advertisement