होर्डिंग्जची जबाबदारी पवारांना झटकता येणार नाही !

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लागलेल्या पोस्टरवर त्यांनी मी फलक मी लावले का, असा सवाल केला. महापालिकेने फलक काढण्यासाठी कुणी हात बांधले होते का, असा सवाल पवार यांनी केला.

त्यावर भाजपने पवार यांना प्रत्यु्त्तर दिले आहे. महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्ज काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसनेच काढायला हवे, असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.

मिटकरींनाही प्रत्युत्तर

पवार यांचे गुन्हेगारांसोबत जे होर्डिंग्ज लागले आहेत. ते काढण्याची जबाबदारीही राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. त्यामुळे ते होर्डिंग्ज त्यांनीच काढावेत. महापालिका आणि पोलिसांवर होर्डिंग्स काढण्याची जबाबदारी झटकून चालणार नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसने काढले पाहिजेत, असे मुळीक म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपने लावलेल्या होर्डिंग्जवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यावर मुळीक यांनी मिटकरींनाही प्रत्युत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी यांची देवेंद्र फढणवीस यांच्यावर बोलण्याची योग्यता नाही. फडणवीस हे पुण्याचे आणि राज्याचे विकासपुरुष आहेत. मिटकरी यांच्या पक्षाचे जे होर्डिंग लागले आहेत त्यावर किती गुन्हेगार आहेत हे आधी त्यांनी तपासावं, असं उत्तर मुळीक यांनी दिलं आहे.

होर्डिंग्सबाबत पवार काय म्हणाले?

पिंपरी-चिंचवडमध्ये मी आज येत नाही महाराज, मी अनेक वर्षांपासून येतो. पिंपरी चिंचडवकरांना माझी सर्व मते स्पष्टपणे माहीत आहेत. तुम्ही काही तरी नवी गोष्ट काढण्यासाठी कोणता तरी मुद्दा सोडायचा आणि प्रश्न विचारायचे हे धंदे बंद करा, असा दम भरतानाच अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं नाही.

एक मिनिट मी नियमांचं पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीची लागले असेल तर भाजपची सत्ता आहे. आयुक्त महापौरांनी किंवा शहराचं कामकाज ज्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यावर कारवाई करावी, असं अजितदादा म्हणाले होते.