पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सणासुदीसोबतच देशात करोना महामारीची लाट पुन्हा येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. दुसरी लाटही अशीच सणासुदीच्या (diwali) काळातच आली होती. सध्या रुग्णांमध्ये देखील चढ-उतार होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सणासुदीच्या काळात पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहराच्या विविध भागातील 20 नवीन करोना बाधित रुग्णांची आज नोंद झाली. तर, करोनामुक्त झालेल्या 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

करोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 72 हजार 158 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 161 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 168 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 7 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आज दिवसभरात 135 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 84 हजार 471 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा

4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.

5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे

6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.

दरम्यान, करोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा एकदा निर्बंध घातले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी काळजी घेतल्यास करोना वाढणार नाही असं सुद्धा आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे.