पुणे : पुणे शहर आणि जवळील परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाण (Crime Rate) कमी होताना दिसत नाही. मात्र, दिवसागणित पुण्यात (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. अशातच पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादाय घटना घडली असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरात रस्त्याने चाललेल्या तरुणावर चार जणांनी तलवारीने हल्ला (Crime) करत त्याला लुटल्याचा प्रकार घडला आहे. थरमॅक्स चौकात ही घटना घडली आहे. यावेळी तरुणाजवळील मोबाइल, रोख रक्कम असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावला.

हा प्रकार गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास थरमॅक्स चौकात घडला. या प्रकरणी विजयकुमार मुन्नलाल बघेल (वय ३०, रा. भोसरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२१) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनाेळखी चार जणांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने पायी जात असताना रस्त्याच्या बाजूला मोटारसायकल थांबलेल्या आरोपींनी फिर्यादीची बॅग पकडून तेरे पास जो भी है जल्ही निकाल असे म्हटले.

फिर्यादीने त्याला नकार दिला असता आरोपींनी फिर्यादीच्या हातावर तलवार मारून फिर्यादीच्या खिशातील पाकिटातील एक हजार रुपये, १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तसेच दोन हजार रुपये किमतीची बॅग हिसकावून पळ काढला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर या प्रकारचे हल्ले आणि गुन्हे घडत असल्यामुळे चाकरमानी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. यावर प्रतिबंध आणण्यासाठी पोलिसांनी विशेष अभियान चालविले पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

हे तरुण हातात तलवारी घेऊन परिसरात आरडा-ओरड करत फिरत होते. “आम्ही इथले भाई आहोत. आम्हाला कोणी नडला त्याला कापून काढू’ असे बोलून हे परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक तलवार भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.