पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन झालेली मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी करणारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, आता पर्यंत मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यात वनाझ ते गरवारे कॉलेज (4.91 किमी) आणि पिंपरी ते फुगेवाडी (7.03 किमी) असे दोन प्राधान्य मार्ग सुरू करण्यात आले आहे. तसेच, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर 6 मार्च 2022 पासून मेट्रो धावत आहे.

अश्यातच, आता पिंपरी (Pimpri) ते पुण्यातील सिव्हील कोर्ट या मार्गावर (Pimpri to civil court metro) पुणे मेट्रो डिसेंबर महिन्यात धावणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल.

मेट्रो कामासंदर्भात माहिती महामेट्रो प्रशासनातर्फे नुकतीच देण्यात आली. महामेट्रोचे सरव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, पिंपरी ते फुगेवाडीच्या पुढे दापोडी, बोपोडी, खडकी स्टेशन, रेंजहिल्स, शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट या मार्गावर वेगात कामे सुरू आहेत.

त्या मार्गाचे काम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर मेट्रोची पिंपरी ते सिव्हील कोर्ट अशी चाचणी घेण्यात येणार आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) अंतिम परवानगीनंतर साधारण डिसेंबर महिन्यात त्या मार्गावरून मेट्रो प्रवाशांसाठी धावेल.

मेट्रो टप्पाटप्प्याने सुरू न करता थेट सिव्हील कोर्ट स्टेशनपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वनाज ते सिव्हील कोर्ट या मार्गावरही मेट्रो धावणार आहे.त्या प्रवासाचा तिकीट दर 30 रूपये असणार आहे.

पीएमपीएलप्रमाणे मेट्रोने प्रवाशांसाठी सवलत योजना घोषित केली आहे. पाचशे रूपये भरून कार्ड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला महिन्याभरात कोठेही कितीही वेळा फिरत येणार आहे. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.

तसेच, पुण्यात देखील आता शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून मेट्रोसाटी 112 खांबांची उभारणी झाल्यानंतर खांब गर्डरने जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही मार्गिका एकूण 23.3 किलोमीटर अंतराची आहे.