Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लुटणारी पिंकी अटकेत

महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळी दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलांना प्रसादातून गुंगीचे औषध देऊन लुटणा-या पिंकीला पोलिसांनी अटक केली आहे.

पिंकी झारखंडची

धार्मिक स्थळावर दर्शनासाठी आलेल्या वृद्ध महिलांना प्रसादातून गुंगीचे औषध खायला देऊन त्यांना लुटणाऱ्या पिंकी नावाच्या महिलेस अखेर फरासखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी तिच्याकडून गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त केले. पिंकी परियाल (रा.गौशाला रोड, जमशेदपूर, झारखंड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

Advertisement

दागिने लुबाडून व्हायची पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 72 वर्षीय महिला बुधवार पेठेत किरकोळ वस्तू विक्री करीत होती. त्या वेळी वृद्ध महिलेला संबंधीत महिलेने 25 जून रोजी दरमहा दोन हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला रिक्षातून स्वारगेट येथे नेले.

रिक्षातच महिलेस प्रसादातून गुंगीचे औषध देऊन तिच्याकडील रोकड व अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन महिला पसार झाली होती. या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू करण्यात आला.

पाळत ठेवून तपास

फरासखाना पोलिस तपास करीत असताना संशयित महिला पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये जाताना पोलिसांना दिसली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजच्या नोंदणी पुस्तकाची पाहणी केली.

Advertisement

त्यामध्ये त्यांना पिंकी परीयाल असे नाव नोंदविल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले.

पुणे स्टेशनच्या परिसरातच पिंकी चोरी करण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या सुचनेनुसार, सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग याच्या पथकाने तिला सापळा रचून ताब्यात घेतले.

अशी होती पिंकीची लुबाडण्याची पद्धत !

पिंकी परियाल ही झारखंडमधील गौशाला रोड परिसरातील मुळची रहिवासी आहे. ती पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाते.

Advertisement

तेथे वृद्ध महिलांना झोपेच्या गोळ्याची पावडर मिसळलेले पेढे खायला द्यायची. महिला बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने व रोकड घेऊन ती पळ काढत होती. शिर्डी परिसरातदेखील तिने याच पद्धतीने महिलांचे दागिने चोरले होते.

Leave a comment