मुंबई: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत.

त्यातील कुठल्या सुविधा भविष्यात काय स्वरूपी ठेवता येतील व कोणत्या सेवांचे श्रेणीवर्धन करता येईल, याचा आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी द्या

राज्यात करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना याचा ठाकरे यांनी आढावा घेतला.

त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील आरोग्य सेवा-सुविधा तसेच प्राणवायू उत्पादन निर्मिती व साठवणूक क्षमता यांची त्यांनी माहिती घेतली.

आरोग्य संस्थांची जी बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जातात, त्याची कालबद्धता आणि जबाबदारी निश्चित करावी.

आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण व दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

दुर्गम भागासाठी उद्योजकांचे सहकार्य घ्या

नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देतानाच पदांनाही मंजुरी दिल्यास कालापव्यय टाळता येईल.
दुर्गम भागातील आरोग्य सुविधांसाठी उद्योजक, संस्थांची मदत घेता येईल का याचाही विचार करावा.

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातील सादरीकरण करून ते कोणती जबाबदारी घेऊ शकतात हे त्यांना विचारावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मेळघाट, जव्हार, मोखाडा यासारख्या आदिवासी भागातील आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की कोविड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना किती आरोग्य सुविधा, ऑक्सिजन आणि औषध साठा लागेल याची निश्चिती करा.

दररोज तीन हजार टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्णत्वाला नेताना राज्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वेगाने वाढवावी. जुलैअखेरपर्यंत मंजुरी दिलेले ऑक्सिजन प्रकल्प उभे राहतील याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे.

संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात किती रुग्णसंख्या राहील हे आताच सांगणे कठीण आहे. त्यामुळे भविष्यात गरजेच्या वेळी लागणारा पुरेसा ऑक्सिजन साठा निर्माण करून ऑक्सिजनसाठीची स्वयंपूर्णता केव्हाही चांगली राहील.

ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे, तेथे ऑक्सिजन साठा वाढविण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू कराव्यात.