पीएमपी बसच्या टोलचा प्रश्न निकाली

खेड शिवापूर टोलनाक्यावर पैसे भरण्यावरून पीएमपी बस प्रशासन व टोल नाक्याचा ठेकेदार यांच्यात वाद झाला होता.

त्यामुळे पीएमपीच्या गाड्यांना तिथे बंदी घालण्यात आली होती. अखेर पीएमीपी प्रशासनाने आगाऊ पैसे भरल्याने आता वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

प्रवाशांची गैरसोय टळली

सातारा रस्त्यावर सारोळा, कापूरहोळ येथील बालाजी मंदिर आणि विंझर या मार्गांवर पीएमपीच्या बस सुरू आहेत. पैसे भरण्यावरून टोल प्रशासनाशी वाद झाल्याने त्यांनी पीएमपीच्या बसवर बंदी घातली होती. त्यामुळे त्या- त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे यांनी आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेतली. बस सुरू करण्यासाठी टोल प्रशासनाला सहकार्य करण्यास सांगावे, अशी विनंती केली. त्यानुसार थोपटे यांनी प्रतिबस चार हजार रुपये दरमहा रुपयांची रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार पीएमपीने १२ बसचे पैसे भरले. त्यानंतर टोल प्रशासनाने बस सोडण्यास सुरुवात केली.

सहा बस सुरू

सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोल नाक्याच्या पलीकडील मार्गांसाठी पीएमपीने आगाऊ पैसे भरल्यामुळे तेथील वाहतूक तूर्त सुरू झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सध्या सारोळा मार्गावर नऊ, कापूरहोळसाठी तीन आणि विंझरसाठी सहा बस रोज धावत आहेत. त्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती झेंडे यांनी दिली.

खासगी वाहनांना सूट, पीएमपीला नाही

या टोल नाक्यावरून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील खासगी वाहनांना टोल माफ आहे. त्याच धर्तीवर पीएमपीच्या बसलाही टोल माफी मिळावी, कारण सार्वजनिक वाहतूक संस्थेला राज्यात अन्यत्र टोल माफी आहे, अशी पीएमपीची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशीही पत्रव्यवहार केला. तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशीही संवाद साधला. परंतु, त्यांनी पीएमपीला सवलत देण्यास नकार दिला. त्यामुळे पीएमपीने काही काळ बस बंद ठेवली होती.