file photo

पुणेः पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना राजकीय मतपेढी विस्तारण्यासाठी वेगवेल्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. निवडणुकीच्या वर्षांत महिलांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसा विचार सुरू झाला आहे.

नवनियुक्त अध्यक्षांची घोषणा

‘दिल्लीच्या धर्तीवर पुण्यातही महिलांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमधून संपूर्ण मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा विचार सुरू आहे,’ अशी महिती पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

मिश्रा यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनतर त्यांनी पीएमपीच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, वाहतूक व्यवस्थापक (प्रभारी) दत्तात्रय झेंडे, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) सतीश घाटे आदी उपस्थित होते.

Advertisement

किती भार पडणार?

पीएमपीची प्रवासी संख्या वाढवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आदींसाठी महिलांना मोफत प्रवास सुविधा देण्याचा विचार आहे;

मात्र त्यापूर्वी एकूण प्रवाशांमध्ये महिलांची संख्या किती, त्याचा महामंडळावर किती भार पडेल, या गोष्टींचा विचार केल्यानंतरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

महिला विशेष बसची संख्या वाढविणार

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला विशेष बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून पीएमपीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात उत्पन्न वाढीवर विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

सेवा डिजिटायझेशनवर भर

‘प्रवाशांना त्यांच्या मार्गावरील बसचे लाइव्ह लोकेशन कळाले पाहिजे. बसमध्ये चढल्यानंतर यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सोय मोबाइलद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

तसेच, प्रवाशांच्या सेवेबाबतच्या विविध तक्रारींसाठी हेल्पलाइन आणि पीएमपी ई-कनेक्ट ॲप्लिकेशन याचे सक्षमीकरण करण्यात येईल,’ असे मिश्रा यांनी सांगितले.

Advertisement