पुणे – करोनासह विविध कारणांमुळे 2019 पासून लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर मुहुर्त मिळाला आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस भरतीची (Police recruitment) प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या नोव्हेंबर पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

बहुप्रतिक्षीत पोलीस भरती (Police recruitment) प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14956 जागांसाठी आहे. यासाठी येत्या 3 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत असणार आहे.

पोलीस शिपाई पदासाठी प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

दरम्यान, ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 110 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत.

लेखी परीक्षेत सुध्दा किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे.

मागील तीन वर्षापासून रखडलेल्या (Police recruitment) पोलीस भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त गवसला असून, राज्य पोलीस दलातील पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयावर बोलताना बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, ‘सन 2019 पासून करोना महामारीमुळे व इतर कारणांनी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती.

उमेदवार खुप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. शासनाने सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे’. असं ते यावेळी म्हणाले.