चौकशीसाठी दुचाकीस्वाराला थांबविणाऱ्या बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्याला एका दुचाकीस्वाराने ५० फूट फरफटत नेले. ही घटना वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी (दि.२८) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

संजय एकनाथ शेडगे (वय ४२, रा. आढाले, मावळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार शंकर तुकाराम इंगळे (वय ४७) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड हिंजवडी रोडवर इंडियन पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी आहे. या ठिकाणी फिर्यादी पोलिस कर्तव्य बजावत असताना दुचाकीवरून आलेल्या शेडगे याला चौकशीसाठी थांबण्याचा इशारा त्यांनी केला.

Advertisement

चालकाने गाडी बाजूला घेतली, त्याला लायसन्स, कागदपत्रांची विचारणा केली असता तो धक्का देऊन पळ काढू लागला. फिर्यादी यांचा हात गाडीच्या कॅरेजमध्ये अडकला. तरीही त्याने इंगळे यांना ५० फूट फरफटत नेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.