Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

लाच स्वीकारण्याचा पोलिसांचा हायटेक मार्ग

लाच म्हणून रोख पैसे घेता येणे धोक्याचे असेल, तर काय करायचे? विनामास्क फिरणा-याकडून दंड स्वीकारण्यासाठी पुणे पोलिसांनी कार्डद्वारे पैसे स्वीकारण्याची सोय केली. पोलिस तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर आता लाच खाण्यातही पोलिस हायटेक झाले आहेत.

फोन पे वर स्वीकारली लाच

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील ड्युटी अंमलदाराने आपल्या सहका-याकडून पे फोनद्वारे लाच स्वीकारली. याप्रकरणी पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी या ड्युटी अंमलदाराला निलंबित केले आहे. प्रमोद विक्रम कोकाटे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

ठरावीक ठिकाणी डयुटी लावण्यासाठी लाच

पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना ड्युटी लावण्याचे काम ड्युटी अंमलदाराकडे असते. आपल्याला सोयीची ड्युटी लावावी, यासाठी अनेक जण ड्युटी अंमलदाराची मर्जी संभाळण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे लाच द्यावी लागते, हा पोलिसांमधील नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे.

वारजे माळवाडी येथील ड्युटी अंमलदार प्रमोद कोकाटे याने एका पोलिस शिपायाला जाणून बुजून त्रास देऊन सतत लाचेची मागणी करीत होते.

त्यांना काम शिकायचे असल्यामुळे त्यांनी मजबुरीतून २६ नोव्हेंबर २०१९ व १४ जानेवारी २०२० रोजी फोन पेद्वारे प्रमोद कोकाटे याला लाच दिली.

पोलिस शिपायाने केलेल्या तक्रार अर्जासोबत फोन पेचे स्क्रिन शॉटही जोडले होते. सहायक पोलिस आयुक्तांमार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली.

त्यात कोकाटे याने आपण पैसे उसने दिले होते, ते त्यांनी फोन पेद्वारे पाठविल्याचे सांगितले; मात्र कोणताही पुरावा दिला नाही.

त्यामुळे कोकाटे याने लाच स्वीकारली असे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रमोद कोकाटे याला निलंबित करण्यात आले आहे.

Leave a comment