‘वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरम’ ही जागतिक जैव-अर्थशास्त्र क्षेत्रातील शिखर संस्था असून तिच्या सल्लागार मंडळावर प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे. भारताला अशा प्रकारचे स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संस्थेचा उद्देश

या संस्थेद्वारे विविध भागधारक, नीती रचनाकार, वन उद्योग, जैव तंत्रज्ञानाधारित उद्योग व संलग्न संघटना, रसायन उद्योग इत्यादींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

या मंचाचा उद्देश शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाबद्दल जागरूकता वाढविणे आणि चक्रीय जैव अर्थशास्त्रातील नवकल्पनांच्या माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचा कार्यक्षम उपयोग करणे हा आहे.

तज्ज्ञांच्या पंक्तीत स्थान

‘वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरम’ च्या सल्लागार मंडळातील समावेशामुळे डॉ. चौधरी यांनी जैव तंत्रज्ञान उद्योगातील तज्ज्ञ गट, जैव तसेच वन उद्योगातील विचारवंत आणि अर्थतज्ज्ञांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे.

उभरत्या जैव अर्थव्यवस्थेची आगामी उद्दिष्टे ठरविणे तसेच त्या क्षेत्रातील नवनवीन संधी ओळखणे आणि त्याद्वारे उज्ज्वल, शाश्वत विकासासाठी एकत्रितपणे काम कसे करता येईल याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून देणे, याकामी जैवतंत्रज्ञान उद्योगविश्वाला मार्गदर्शन करण्याची मोलाची भूमिका हे सल्लागार मंडळ निभावीत आहे.

काय म्हणाले चौधरी ?

डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, की “वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळामध्ये सहभागी होताना मला आनंद वाटत आहे. ही एक सन्माननीय संस्था आहे.

जैव अर्थशास्त्राच्या क्षमतेचा योग्य व पुरेपूर रीतीने उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने ही संस्था काम करत आहे. मंडळाच्या इतर सदस्यांना भेटण्यास, माझे अनुभव आणि ज्ञान यांची आदानप्रदान करण्यास मी उत्सुक आहे.”