हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरांत शनिवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून तीन तास पाऊस पडत होता.

या पावसात गाराही पडल्या व सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामध्ये वारा जास्त असल्याने अनेक ठिकाणच्या गोठ्यांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. ऊस, मका, कडवळ यासारख्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे.

यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याचा जास्त जोर असल्याने यवत- कोरेगाव मेनलाइनमधील कासुर्डीत एक पोल पडल्याने उरुळी कांचनमधील वीज पुरवठा खंडीत झाला. गेले पंधरा दिवसापासून उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते.

Advertisement

शनिवारी (दि.२९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उरुळी कांचन परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उरुळी कांचन, कोरेगाव मूळ,

भवरापूर, शिंदवणे, खामगाव, टिळेकरवाडी, कासुर्डी, डाळिंब गाव, तरडे, वळती परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात तीन तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उभ्या पिकामध्ये पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Advertisement