कैद्यांना आता मिळणार चिकन, मिठाई!

पूर्वी कैद्याना जेलर ठरवील, तेच खावे लागायचे;परंतु आता जेलसाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून कैद्यांना जिभेचे चोचले पुरवता येणार आहेत; परंतु त्यासाठी पैसे मोजायची तयारी ठेवावी लागेल.

आवडीचे पदार्थ मिळणार

तुरुंगात आता कैद्यांच्या आवडीप्रमाणे सर्व अन्नपदार्थ मिळणार आहेत. अगदी मांसाहारापासून ते मिठाईपर्यंत सर्वकाही मिळणार आहे.

या खाद्यपदार्थांची यादीच तुरुंग प्रशासनाने जाहीर केली आहे; मात्र या पदार्थांसाठी कैद्यांना पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी दिली आहे.

तुरुंगात कोणते पदार्थ मिळणार ?

चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, हंगामी फळे, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, सामोसा, च्यवनप्राश, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा, कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, कोफी, फेस वोश, टर्मरिक क्रीम, एनर्जी बार, ग्लुकोन डी, अंघोळीचे साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स व्हेज, अंडा करी, वडा पाव इत्यादी पदार्थ आता राज्यातील तुरुंगांमधील कॅन्टीन्समध्ये मिळणार आहे.

पैसे मोजावे लागणार

कैद्यांना हे खाद्य पदार्थ मिळणार असले तरी या पदार्थांसाठी कैद्यांना पैसे मोजावे लागणार आहे. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या पैशांमधून दर महिन्याला साडे चार हजार रुपये कॅन्टीनमधील पदार्थ खरेदी करण्यासाठी वापरण्याची मुभा असते.

त्याचा उपयोग करून कैदी आता या पदार्थांपैकी कोणताही पदार्थ खरेदी करू शकणार आहेत. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी तुरुंग प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील अनेक पदार्थ कैद्यांना आधीही कॅन्टीनमध्ये विकत घेता येत होते; मात्र आता त्यामध्ये अनेक पदार्थांची भर घालण्यात आली आहे.