राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद होत असून मुख्यमंत्र्यांच्या कानटोचणीनंतरही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार स्वबळाची भाषा वापरत असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कान टोचले आहेत.

आघाडी तोडण्याचा विचार नाही

पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतिक्रिया देताना तीन पक्षांची आघाडी तोडण्याचा काँग्रेसचा कुठलाही विचार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाच वर्षे पूर्ण पाठिंबा राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे.

तीन पक्षांच्या युतीनं जे महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे, ते काँग्रेस तोडणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल.

भाजपला सरकारबाहेर ठेवण्यासाठी ही आघाडी तयार झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही.”

काँग्रेसचा स्वबळाचा नारा कसा महत्वाचा?

काँग्रेस महाविकास आघाडीला कमजोर करत असल्याचा दावा नाकारत चव्हाण म्हणाले, की काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल असं म्हणण्यात काही गैर नाही.

जर आम्ही एक तृतीयांश जागा लढवणार आहोत असं म्हटलं असतं तर यानुसार आमच्या वाटाल्या २८८ पैकी ८० जागाच येतील; पण त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये इतर जागांवर लढण्यासाठी उत्साह राहणार नाही.”

पटोलेंचे विधान गांभीर्याने घेऊ नका

मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ला देताना चव्हाण म्हणाले, की, पटोले यांचं विधान गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे.

अध्यक्ष असल्याने पक्षाची ताकद वाढवणे आणि पक्षात पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याचं विधान हे याच परिप्रेक्षातून समजून घेणं गरजेचं आहे.