Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच

राज्यात एक हजार 674 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आली; मात्र तीन हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया कोरोनाच्या काळात थांबलेली होती.

ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

पात्रताधारक प्राध्यापकांचे आंदोलन मागे

नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने विविध मागण्यांच्यासंदर्भात पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार होते. उच्चस्तरीय समितीच्यावतीने एकूण चार हजार 74 प्राध्यापक भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी काही प्राध्यापकांची भरती झाली आहे. शिक्षणमत्र्यांच्या या निर्णयाचे नेट-सेट पीएचडी पात्रताधारकांनी स्वागत करत संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनातून मार्ग

पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने तसेच नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनासंदर्भात प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता (दूरदृष्यप्रणालीद्वारे) जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, संचालक धनराज माने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

अजित पवार घेणार निर्णय

प्राध्यापक भरती प्रकियेच्या नस्तीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाही पूर्ण करून सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही पूर्ण करत पुढील कार्यवाहीसाठी वित्त विभागाकडे नुकतीच सादर केलेली आहे. वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मान्यता घेतल्यानंतर भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांबाबतही लवकरच निर्णय

2020 या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहित धरुन 700 पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले. 2020 या वर्षापर्यंत प्राध्यापकांची किती पदे रिक्त आहेत, याबाबतच दोन महिन्यात सर्व्हेक्षण करुन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने 48 मिनिटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएचबी संदर्भात निर्णय घेण्यासाठी संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षेतखाली समिती गठित करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ग्रंथपाल भरती
महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्यावतीने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये तसेच विद्यापिठातील ग्रंथपाल भरतीसंदर्भात केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 121 ग्रंथपाल भरती तसेच विद्यापीठातील शिक्षकीय 659 भरती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्यावतीने स्वागत करत 28 जूनला होणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Leave a comment