खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांसद आदर्श ग्राम कोपरे येथे स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना राबविण्याची मागणी केल्यानंतर तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी कोपरे, जांभुळशी, मांडवे, मुथाळणे गावांची पाहणी करून टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दुर्गम आदिवासी क्षेत्रातील कोपरे गाव हे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची येथील पाणीटंचाई दूर होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी सातत्याने व्यक्त केली होती. मात्र गाव दत्तक घेतल्यानंतर लगेचच लॉकडाऊन जाहीर झाला.

त्यामुळे अधिकाऱ्यांना पाहणी करण्यात अडचणी होत्या. शिवाय गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले कोविडचे संकट अद्याप दूर झाले नसल्याने निधीही उपलब्ध नव्हता. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला असला तरी कोविडची दुसरी लाट ओसरु लागताच खासदार डॉ. कोल्हे यांनी तातडीने या प्रश्नी लक्ष घातले आहे.

Advertisement

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता भुजबळ, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी उपअभियंता कैलास टोपे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले,

सरपंच ठमाजी कवठे, खासदारांचे प्रतिनिधी विजय कोल्हे व स्वीय सहायक तुषार डोके आदी उपस्थित होते. मुख्य अभियंता भुजबळ यांनी तातडीने स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत जागा निश्चिती करुन पाणी साठवण टाकी प्रस्तावित करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.

त्याचबरोबर या खोऱ्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी मांडवी नदी खोऱ्यात एमआय टँक बांधण्यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी चर्चा करुन लवकरच जलसंपदा व जलसंधारण विभागांसमवेत संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे सूतोवाच मुख्य अभियंता भुजबळ यांनी केले.

Advertisement