नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि रिंगरोडसाठी जमिनी देण्यास शेतक-यांचा विरोध होत आहे. राजगुरूनगरला शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागं घेण्यावरून पोलिस आणि आंदोलकांत शाब्दिक बाचाबाची झाली.

गुन्हे दाखल करण्याची धमकी

पुणे रिंगरोड आणि पुणे- नाशिक रेल्वे मार्गाच्या जमीन संपादन प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी सुरू असलेल्या राजगुरूनगर येथील आंदोलनाला परवानगी नसल्याने स्थगित करावे, असे सांगत खेड पोलिसांनी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याची धमकी दिली.

या प्रकाराने आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण पसरले.

Advertisement

हे आंदोलन दडपण्याचा प्रकार होत असून, शेतकरी परिवारासह आत्मदहन करतील असा इशारा खेड तालुका रिंगरोड व रेल्वे विरोधी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी दिला.

१२ गावे बाधित

राजगुरूनगर तालुक्यातील १२ गावांतून पुणे-नाशिक रेल्वे आणि रिंग रोड प्रकल्प होणार आहे. या गावांच्या शेतकरी प्रतिनिधींनी २९ तारखेपासून प्रांत कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी वाचन करून चक्रीउपोषण आंदोलनास सुरूवात केली आहे.

खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, च-होली, धानोरे, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या गावांचा त्यात समावेश आहे.

Advertisement

दडपशाहीचा प्रश्नच नाही

या आंदोलनाला कोणतीही परवानगी दिलेली नाही. कोविड परिस्थिती नियमानुसार पाच जणांना आंदोलनस्थळी राहण्यास सांगितले होते. या ठिकाणी गर्दी करू नये याबाबत नोटीसदेखील बजावली होती.

आंदोलनकर्त्यांची गर्दी झाली म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप केला. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यात येत आहे. तर यात दडपशाहीचा विषयच नाही, असे पोलिस अधिका-यांनी सांगितले.

 

Advertisement