मुंबईः इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलन केले. त्याचे नेतृत्व ठिकठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी केले. पोलिसांनी आंदोलक नेत्यांना अटक करून सोडून दिले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आरक्षण
– ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृ्त्वाखाली आंदोलन सुरू असून त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे नागपूरमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प
ओबीसी पदोन्नती आरक्षणा संदर्भात आज भाजपचे नेतेमंडळी राज्यातील विविध जिल्ह्यांत चक्काजाम आंदोलन करत आहेत.
शहरातील किंवा जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर बसून हे आंदोलन केले जात आहे. भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवणी दरेकर यांना ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तर मुलुंड इथं आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईत भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं.
आंदोलनं सुपरस्प्रेडर ठरणार
दरम्यान, भाजपच्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राज्यात कोरोनाचं संकट कमी झालेलं नाही.
त्यातच डेल्टा प्लसने नवं आव्हान निर्माण केलं असताना असे आंदोलन सुपरस्प्रेडर तर ठरणार नाही ना असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आंदोलनात अनेकजण मास्कशिवाय दिसत आहेत. तसंच सोशल डिस्टन्सिंग कुठंही नसल्याचं दिसत आहे.