पुणे – सध्या “हर हर महादेव’ (har har mahadev) या चित्रपटावरून चांगलेच वाद होताना दिसून येत आहे. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात देखील चांगलाच वाद निर्माण झाला आहे. नुकतंच ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) या चित्रपटाचा (har har mahadev) मोफत शो ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावरून सध्या या दोन पक्षांमध्ये चांगलाच राडा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, यावरून आता मनसे आक्रमक झाली असून जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसे सरचिटणीस अजय शिंदे (Ajay shinde) यांनी दिला आहे.

राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी चित्रपटाला विरोध करू नका, असं सांगतानाच मनसे पदाधिकारी आज पुन्हा शोज सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काल मुंबईतील मनसे नेत्यांनी मुंबई-अहमदाबाद मार्गावर असलेल्या आयनॉक्स सिनेमा व्यवस्थापकांना हर हर महादेव सिनेमा तात्काळ सुरू करावा यासाठी पत्र दिले.

मनसे कामगार नेते, विधानसभा अध्यक्ष व नाविक सेना सरचिटणीस संदीप राणे यांच्या नेतत्वाखालील हे पत्र देण्यात आले. हा सिनेमा तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

राष्ट्रवादीने हर हर महादेव चित्रपटात गोंधळ घातल्या नंतर काल मनसेकडून खास शोचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांसाठी हा शो ठेवण्यात आला होता. हर हर महादेवच्या या विशेष शोला अमेय खोपकर देखील उपस्थित होते.

तर, पिंपरीमध्ये सोमवारी “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडला होता. छत्रपती संभाजीराजेयांनी पुण्यात इशारा दिल्यानंतर आज त्याचे तात्काळ पडसाद उमटले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मध्ये घुसून घोषणाबाजी करत चित्रपट चा शो बंद पाडला आहे.