पुणे – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn Project) C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना, अश्यातच आणखी एक मोठा उद्योग प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा ‘सॅफ्रन’ (Safran Project) कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने सत्ताधारी-विरोधकांमधील वाद आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सॅफ्रन ग्रुप (Safran Project) मिहानमध्ये 1185 कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असून, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. या प्रकल्पामुळे 500 ते 600 कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.

दरम्यान, मागील तीन महिन्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबससह तब्बल 22 प्रकल्प हे महाराष्ट्रामधून गुजरातसह इतर राज्यात गेल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मामलेदार कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील यावेळी करण्यात आली.

“राज्यात ईडी सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी झाला. त्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी अनेक वेळा झाली. त्यामधून राज्याला काही तरी मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र या दिल्लीवारी मधून काहीच मिळाले नाही. पण वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रामधून गुजरात सह इतर राज्यात गेले आहेत.

या दौर्‍या दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना थोडीशी तरी कल्पना असणार, किमान त्यावेळी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायाला पाहिजे होते.

आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करीत असून लवकरात लवकर राज्यातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा” अशी टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.