पुणे – पुणे शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रके (banners, flex, hoardings) लावून विद्रुपीकरण करणार्‍यांविरोधात महापालिका प्रशासनाने आता अधिकच ‘कठोर’ भूमिका घेतली आहे. अशा बेकायदा जाहिरातींना प्रत्येक फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीपत्रकांसाठी (banners, flex, hoardings) एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड न भरल्यास संबधितांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

पण, आकाशचिन्ह विभागाने एकालाही नोटीस दिली नाही. अश्यातच पुन्हा एकदा आयुक्तांनी आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त, पाच परिमंडळाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली.

पुणे शहर आणि परिसरात सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस तसेच जाहिरांतींचे बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्ती पत्रके मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. त्यामुळे फ्लेक्सबाजी (banners, flex, hoardings) करून शहर विद्रूप केले जात असल्याचं दिसून येत आहे.

या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार होती, पण या नोटिसा थांबविल्या असून, आता सात दिवसांत शहर स्वच्छ करा; अन्यथा कारवाई निश्‍चीत आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्टपणे बजावले आहे.

शहरात महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, राजकीय नेत्याचा वाढदिवस, राजकीय कार्यक्रम यांसह व्यावसायिक जाहिराती अनधिकृतपणे लावल्या जात आहेत. या फ्लेक्सबाजीमुळे (banners, flex, hoardings) शहर विद्रूप होत आहे.

वारंवार सूचना देऊनही क्षेत्रीय कार्यालय, आकाश चिन्ह विभाग दुर्लक्ष करत आहेत. चमकोगिरी करणाऱ्यांकडून दंड वसूल करून कारवाई करावी, यासाठी आता प्रति फ्लेक्स एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश आहेत.

पण, आकाश चिन्ह विभागाचे निरीक्षक दंड वसूल करण्याकडेही दुर्लक्ष करत असल्याने फ्लेक्सबाजी करणाऱ्यांना अभय मिळत आहे. मात्र, यापुढे फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई होणार हे निश्चित झाले आहे.