पुणे – पुणे शहरातील चांदणी चौकातील (Chandani Chowk) एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी नुकतीच बुधवारी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे. असे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा ठरत असलेला मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील (Chandani Chowk) जुना पूल 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास जमीदोस्त करण्यात आला होता.

जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्त्यासाठी व इतर कामासाठी दोन्ही बाजूचे खडकाचे खोदकाम प्रगतीत आहे. या प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. जून 2023 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करणार आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा दिशेला पाच लेन व सातारा- मुंबईसाठी तीन लेन अशा एकूण आठ लेन वाहतुकीस उपलब्ध आहेत. तसेच साताऱ्याकडून एनडीए मार्गे मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त 2 लेन उपलब्ध आहेत.

बेंगळुरू मुंबई हायवेवरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे आधार भिंतीचे (रिटेनिंग वॉल) व माती भरावाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम 15 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

श्रृंगेरी मठाच्या बाजूने सातारा वारजेकडे जाणाऱ्या 4 पदरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूकीस खुला केलेला आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. 6 चे काम प्रगतीत असून दिड महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील वाहतूक सुरळीत होईल.

दरम्यान, जेव्हा हा पूल पाडण्यात आला तेव्हा तो संपूर्ण पूल पडलाच नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे पुलाचा (Chandani Chowk) सांगडा शिल्लक राहिल्यानं तो नंतर पाडण्यात आला.