गेल्या पंधरा वर्षांपासून शेतक-यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देणा-या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या खरीप हंगामात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांना दीड हजार कोटी रुपयांचे कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले आहे.

सर्वाधिक कर्ज देणारी राज्यातील एकमेव बँक

पुणे जिल्हा बॅंकेने चालू वर्षीच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे एक लाख ९२ हजार ९५८ शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले आहे.

या सर्व शेतकऱ्यांना मिळून एक हजार ४४४ कोटी ७२ लाख ८६ हजार ८९१ रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. शून्य टक्के व्याजाने एवढ्या मोठ्या रक्कमेचे वाटप करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा बँक ठरली आहे.

Advertisement

कर्जवाटपाचा पुणे पॅटर्न राज्यभर

गेल्या पंधरा वर्षापासून पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बॅंकेनेही पुणे जिल्हा बॅंकेच्या पावलावर पाऊल ठेवत, हाच उपक्रम दहा वर्षांपासून सुरू केला आहे.

पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात शून्य टक्के व्याजाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून, राज्य सरकारने चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून राज्यभर कर्ज वाटपाचा हा ‘पॅटर्न’ सुरू केला आहे.

फक्त तीन हजार शेतक-यांना जादा व्याजदराचे कर्ज

तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या केवळ २ हजार ७०१ इतकी आहे. या सर्व शेतकऱ्यांना मिळून ८८ कोटी ४७ लाख २८ हजार ९०० रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

Advertisement

तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार व्याज आकारले जाणार असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.

 

Advertisement