पुणे शहराच्या धानोरीत मायलेकराचा निर्घृण खून करण्यात आल्याचे मंगळवारी (दि. १५) निष्पन्न झाल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्व शक्यता पडताळून शहर व जिल्हा पोलीस दलाच्या पथकांनी संयुक्त तपास जारी केला आहे.

अयान आबिद शेख (वय १०) व आलिया आबिद शेख (३९, दोघे रा. धानोरी) ही मृत मायलेकराची नावे आहेत. कुटुंबप्रमुख आबिद शेख (रा. धानोरी, पुणे) याचा अद्याप ठावठिकाणा लागला नसून, त्याच्या शोधासाठी राज्यात व मध्य प्रदेशात ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.

आलिया यांचा मृतदेह मंगळवारी (दि.१५) सकाळी पुरंदर तालुक्यातील खळद गावाजवळ आढळला. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले, तर अयान याचा मृतदेह मंगळवारी (दि.१५) सायंकाळी कात्रजमधील दरी पुलाजवळील हॉटेलच्या परिसरात आढळला.

Advertisement

चाकूचे वार करून त्याची हत्या केल्याचे तपासात दिसून आले. खून करून वेगवेगळ्या ठिकाणी या दोघांचे मृतदेह टाकण्यात आले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या कुटुंबीयांची चारचाकी गाडी सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ आढळली.

आलिया यांचा मृतदेह सापडल्यानंतर ग्रामीण पोलीस त्याबाबत तपास करीत होते. कात्रजजवळ मिळालेल्या अयानच्या मृतदेहाबाबत स्थानिक भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत होते. मात्र, हे दोघे मायलेक आहेत, याची संगती रात्री उशिरा लागली.

पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा सावंत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांशी समन्वय साधून तपास जारी केला आहे. आलिया यांचा पती आबिद अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्डची पडताळणी सुरू आहे. त्याच्या मित्र व नातलगांकडेही याबाबत कसून चौकशी सुरू आहे.

Advertisement

आबिद हा मूळचा मध्यप्रदेशातील विदिशामधील रहिवासी आहे. नोकरीच्या निमित्ताने तो गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह धानोरी परिसरातील एका फ्लॅटमध्ये राहत होता. खासगी कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरीला आहे.

त्याने फिरायला जाण्यासाठी तीन दिवसांपूर्वी एक कार भाड्याने घेतली होती. त्यातून हे तिघेजण बाहेर पडले, असे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना सांगितले. तेथून तो नेमका कोठे गेला हे समजू शकलेले नाही. खुनाचा प्रकार नेमका कशामुळे घडला, याबाबतही काही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

Advertisement