पुणे – दिवाळीचा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी हे शब्द कोणाच्या तरी तोंडून ऐकणारी कातकरी समाजाची वस्ती आकाशकंदील, फराळ, फटाके आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. दिवाळी (Diwali)हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. त्यानुसारच दरवर्षी गरीबांच्या वस्तीत जावून तेथे मिठाई, फटाके वाटून काही जण आपली दिवाळी साजरी करतात.

दरम्यान, पुण्यापासून (pune) अगदी मोजक्या अंतरावर असलेल्या डोंगर द-यामध्ये राहणारे कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्यांनी ही फटाके उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.

गुरुवार पेठेतील वीर शिवराय तरुण मंडळ आणि येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ, बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुणे सातारा रस्त्यावरील कापूरहोळ जवळ चेलाडी या आदिवासी पाड्यावर ५० कुटुंबाला दिवाळी फराळ व आकाशकंदिल देण्यात आले.

यावेळी वीर शिवराय मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, नवज्योत मंडळाचे अमित जाधव, साईनाथ मंडळाचे पियुष शहा उपस्थित होते.

डोंगरावरील या वस्तीमध्ये प्रत्येक घरात जावून कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ, उटणे, पणत्या, आकाशकंदील देऊन कुटुंबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रत्येक घराच्या दरवाजामध्ये आकाशकंदील लावत त्यांना दिवाळीचे महत्त्व सांगितले. चिमुकल्यांनी फटाके उडविण्यासोबतच फराळाचे पदार्थ खाण्याचा आनंदही लुटला.