पुणे – एखाद्या तरी अनाथ आणि विशेष मुलाला, तू मला आवडतोस असे म्हणून आपुलकीच्या भावनेने जवळ घ्यावे, असे मनापासून वाटणा-या आणि ते प्रत्यक्षात असणाऱ्या पुणेकरांनी (pune) एकत्र येत श्रीवत्स संस्थेत अनोखा उपक्रम राबविला. अशा मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात.

त्यामुळे या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे, या भावनेने राबविण्यात आलेल्या आपुलकीच्या दिवाळीने (Diwali) श्रीवत्समधील विशेष मुले भारावून गेली.

निमित्त होते, शनिवार पेठ (Shanivar Peth) मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांतर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरीता आयोजित आपुलकीची दिवाळी या कार्यक्रमाचे.

विविध गाण्यावर नृत्य सादर करीत आपल्या मनातील भावना या चिमुकल्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. श्रीवत्स संस्था आणि सोलापूर येथील श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिक विद्यालय या संस्थांना यांना आवश्यक असणारी ५ लाख रुपयांची आर्थिक व वस्तुरुपी भेट देण्यात आली.

यावेळी पराग ठाकूर म्हणाले, तब्बल २९ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा उपक्रम ५०० रुपये मदतीपासून सुरु झाला होता. आजमितीस या उपक्रमाला समाजातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांकडून मोठया प्रमाणात सहाय्य मिळत आहे.

समाजातील वंचित घटकांना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे, असेही त्यांनी सांगितले.