पुणे – पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहराच्या (Pune City) वेगवेगळ्या भागात तीन ठिकाणी आग (Fire News) लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या मुळे शहरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

पहिली आग ही नेहरू रस्त्यावरील अप्सरा चित्रपटगृहाजवळ लागली होती. सायंकाळी याठिकाणी नाल्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

नाल्यात साठलेला कचरा पेटल्याने आग लागल्याचे जवानांच्या लक्षात आले. अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी दिली.

तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या रविवार पेठेतील तांबोळी मशिदीजवळ तारा माॅल येथे आग लागल्याची घटना घडली आहे.

रविवार पेठेतील तारा माॅल येथे सात मजली इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तारा माॅलच्या इमारतीच्या छतावर ठेवलेल्या रिकाम्या प्लास्टिक टाकीला आग लागल्याचे जवानांच्या निदर्शनास आले.

जवानांनी पाण्याचा मारा करुन दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. आग वेळीच नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे अधिकारी पंकज जगताप. प्रशांत गायकर जवानांनी आग आटोक्यात आणली.

तर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील हडपसर भागातील चिंतामणी नगर परिसरात एका गादी कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, अद्याप ही या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

दरम्यान, शहरात एकाच वेळी तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने सामान्य पुणेकर मात्र चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांना सतर्क आणि काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.