उद्यानाचं शहर म्हणून देशात बंगळूरची ओळख आहे. बंगळूरमध्ये उद्यानाची संख्या जास्त असली, तरी उद्यानाखालील क्षेत्राच्या बाबतीत पुण्यानं बंगळूरवर मात केली आहे.

उद्याने जास्त, क्षेत्रफळ कमी

बंगळूरच्या तुलनेत पुण्यातील उद्यानांनी क्षेत्रफळाच्या बाबतीत बाजी मारल्याचे उद्यान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.

बंगळूरच्या तुलनेत केवळ २० टक्के उद्याने असलेल्या पुण्यातील उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ मात्र बंगळुरुतील उद्यानांच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

बृहत् बंगळुरू महापालिकेच्या आकडेवारीनुसार, एकूण ७०६ चौरस किलोमीटरवर पसरलेल्या बंगळूर शहरात जवळपास ४० लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर एक हजार २० उद्याने आहेत, तर पुणे महापालिकेच्या ३३२ चौरस किलोमीटर हद्दीत (नव्याने समाविष्ट २३ गावे वगळता) जवळपास २५ लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर २०४ उद्याने आहेत.

शहरातील हरित क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ न देता त्यात वाढच होईल, या पद्धतीने विकासकामांचे नियोजन केले जात असल्याचे हे दृश्य परिणाम आहेत, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

१५ थीम पार्क

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय वगळता तीन क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश असलेल्या प्रत्येक परिमंडळात सरासरी साडेतीन लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्रावर उद्यानांची आजवर निर्मिती केली आहे.

Advertisement

सध्या शहरात १५ हून अधिक संकल्पनाधारित उद्याने (थीम पार्क्स) असून, गेल्या चार वर्षांत सहा नव्या उद्यानांसह विविध प्रकल्प राबवून उद्याने अधिक आकर्षक करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल गार्डन

नव्या उपक्रमांतर्गत कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात हत्तींसाठी पोहण्याचा तलाव बांधला आहे. येथील मांजर-हायना-सिंह-जिराफ खंदक व रेप्टाईल पार्कचे काम प्रगतिपथावर असून मत्स्यालय, इंटरप्रिटेशन सेंटर, सभागृह व टॉय ट्रेनचे काम प्रस्तावित आहे.

या प्रकल्पांमुळे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे आकर्षण आणखी वाढणार आहे. सारसबाग व पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून येथील ३२ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय बोटॅनिकल गार्डन विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. ते पूर्ण झाल्यानंतर शहरातील चौथे बोटॅनिकल गार्डन असेल.

Advertisement