पुणे – पुण्यातल्या खडकवासला (khadakwasla) परिसरात पुन्हा एकदा बिबट्या (Leopard) दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, यावेळी या बिबट्याने (Leopard) एका बैलावर हल्ला केल्याने बैल गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी हा बिबट्या खडकवासला सिंहगड परिसरातील जंगलात दिसला होता. दरम्यान, वनविभागाने तातडीने या बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोणजे येथील शेतकरी तानाजी पारगे यांनी सकाळी बैल रानात चरायला सोडला होता. यावेळी डोणजे गावापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बैलावर हल्ला केला.

या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला आहे. बैलाच्या दोन्ही पायावर, मानेवर आणि शेपटीवर गंभीर मोठ्या जखमा दिसुन आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यापूर्वी ही घडल्या घटना…

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत काही दिवसांपूर्वी बिबट्या घुसल्याची घटना घडली होती. तर हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.

त्यानंतर आता पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने येथे वाघ, बिबटे असतील तर त्यांचा बंदोबस्त करावा, त्यांना पकडुन वेळीच जंगलात सोडण्यात यावे असे स्थानिक शेतकरी आणि गावकरी यांनी सांगितले.

कसे टाळता येईल?

दिवसेंदिवस वन्य-प्राणी आणि मानवातला संघर्ष तीव्र होताना दिसतोय. मनुष्याने जंगलामध्ये अतिक्रमण केले. त्यामुळे बिबट्याचा अधिवास संपुष्टात येताना दिसतोय.

शिकारीच्या शोधात बिबटे शहरात प्रवेश करताना दिसतायत. हे टाळण्यासाठी आपल्यालाही थोडे सजग व्हावे लागेल. वनसंपदा जपावी लागेल, अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतायत.