पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन झालेली मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी करणारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, आता पर्यंत मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यात वनाझ ते गरवारे कॉलेज (4.91 किमी) आणि पिंपरी ते फुगेवाडी (7.03 किमी) असे दोन प्राधान्य मार्ग सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, आता पुणे महामेट्रोकडून (Pune Metro) खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा प्रारूप प्रकल्प आराखडा महापालिकेस सादर केला आहे.

या मार्गासाठी सुमारे 8 हजार 565 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली खडकवासला ते स्वारगेट- हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार असून या मार्गावर 22 स्थानके असणार आहेत.

या पूर्वी हा मार्ग मेट्रो आणि पीएमआरडीएकडून संयुक्त करण्यात येणार होता. मात्र, पुम्टाच्या बैठकीत हा स्वतंत्र मार्ग करण्याची शिफारस करण्यात आली.

त्यानुसार, महामेट्रोने हा डीपीआर तयार केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकी संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, हा प्रारूप आराखडा असून महापालिका प्रशासनाकडून त्यात, बदल सुचविल्यानंतर अंतिम आराखडा करून राज्यशासन तसेच केंद्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.