Photo Credit Facebook

एका ठेकेदाराच्या मॅनेजरचे अपहरण करणे, मारहाण करणे आणि ऑफिसमध्ये घुसून राडा घातल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यात पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे फरार होता. दरम्यान घटनेच्या दोन आठवड्यांनी पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले असून बुधवारी (दि.२६) निगडी पोलिसांनी आमदार पुत्रासह इतर तीन साथीदारांना रत्नागिरीतून अटक केली.

गुन्हा दाखल

आमदारपुत्र सिद्धार्थ अण्णा बनसोडे (वय २१, रा.चिंचवड स्टेशन) यांच्यासह पीए सावंतकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. लिंकरोड चिंचवड), सतीश दशरथ लांडगे (वय ४०, रा.कासारवाडी, पिंपरी), रोहित दुर्गेश पंध्ररी (वय २५, रा.चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

जीवे ठार मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल होते. पहिल्या गुन्ह्यात आकुर्डीतील एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रा. लि. यांच्या कार्यालय येथे ११ मे २०२१ रोजी आरोपी आले. त्यांनी कामगारांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ऑफिस बंद करण्यास सांगून कदम व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण

Advertisement

दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी पवार हे आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. १२ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या आकुर्डीतील कार्यालयात असताना आरोपींनी ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करून चिंचवडमधील काळभोरनगरमध्ये नेले.

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

तेथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी पवार यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली.

Advertisement

पळून जाण्याचा बनाव

मात्र, मुख्य सूत्रधार सिद्धार्थ व इतर साथीदार फरार होते. दरम्यान आरोपी रायगड येथे उरण परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलीस पोहोचत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी पोबारा केला. तसेच पोलिसांची दिशाभूल करत पनवेलला पळून जाण्याचा बनाव रचला.

सापळा रचत चौघांना रत्नागिरीहून अटक

Advertisement

मात्र पनवेललाही आरोपी पोलिसांना सापडले नाहीत. शिताफीने तपास करत पोलिसांना आरोपी हे रत्नागिरीतही श्रमसाफल्य फार्म हाऊसवर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शिताफीने सापळा रचत चौघांना रत्नागिरीहून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.