पुणे – पुणे-नाशिक (pune-nashik) या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी अवघ्या दोन तासांपर्यंत कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा (semi high speed railway) बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच, रेल्वे मंत्रालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासोबत एक आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाऐवजी (railway) ‘रेल्वे कम रोड’चा विचार करा, असा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला असून, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरु झाल्या असून, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) म्हणाले, “पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाची प्रक्रिया इतकी पुढे गेल्यानंतर आता प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा रेल्वे मार्ग मंजूर झाला, त्याचा डीपीआर तयार केला. वेगवेगळ्या मंजुरीसाठी 5 वर्षांचा कालावधी गेला.

राज्य सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पासाठी गुंतवणूकपूर्व कामे करण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने दिली.

राज्य सरकारने या रेल्वे मार्गाला मंजुरी देत खर्चातील 20 टक्के वाटा उचलण्यासही मंजुरी दिली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता.

आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झालाय. मग एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का? असा सवाल त्यांनी केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत ते बोलत होते.

नाशिक-पुणे रेल्वे हाय स्पीड 235 किमी चा एकूण मार्ग पुणे अहमदनगर नाशिक जिल्हा होणार आहे. देशातील सर्वात किफायतेशीर अति जलद मार्ग जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्चाचा प्रकल्प असून यात राज्याचा 3273 कोटींचा हिस्सा आहे.

दरम्यान, नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा दोन जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पत आहेत. शिवाय ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात येत आहे.

पुणे – नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

असा असेल हायस्पीड प्रकल्प :

  • 235 किलोमीटर – मार्गाची लांबी
  • 200 किलोमीटर – रेल्वेचा वेग (प्रतितास)
  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये
  • पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून जाणार
  • 18 बोगदे, 41 उड्डाणपूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित
  • पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणेदोन तासांत
  • मार्गावर एकूण 24 स्थानकांची आखणी
  • प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा