पुणे – तू माझा देवा… खुले देवघर…अशा परमेश्वराच्या जवळ नेणाऱ्या कवितांसोबतच राधे तुझ्या पायी गीत गायी… अशा प्रेमाचे महात्म्य उलगडणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाने शब्दांमधील तरल भावनांची सुरेल पायवाट रसिकांनी अनुभवली. नानाविध कविंच्या कविता आणि नवी गीते यांचा सुरेल मिलाफ मी गातो माझे गाणे या शब्द आणि सुरांच्या मैफलीतून पुणेकरांसमोर पेश झाला.

आरव पुणे निर्मीत युवा संगीतकार निखील महामुनी यांच्या मी गातो माझे गाणे या दीपावलीनिमित्त (Diwali) झालेल्या स्वरमैफलीचे आयोजन नवी पेठेतील (Nvai peth) पत्रकार भवन येथे करण्यात आले होते.

नव्या कवितांच्या, नव्या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या रुपाने आगळेवेगळे सादरीकरण अनुभवण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना (Punekar) मिळाली. सुनील काळे, अरुणा ढेरे, आरती प्रभू, संत जनाबाई, वसंत बापट, माधुरी चव्हाण जोशी, तुषार जोशी, संतोष वाटपाडे,

मंदार चोळकर अशा नव्या-जुन्या कवी-कवयत्रींच्या दर्जेदार कवितांना निखील महामुनी यांनी आपल्या स्वरसाजाने केवळ नटवलेच नाही तर अधिक बोलते केले आहे. त्यामुळे रसिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे स्वरपर्वणी ठरली.

आईचे महत्व सांगणारी खुले देवघर… स्वाती शुक्ल यांची जोडप्यांतील हरवत चाललेल्या संवादाविषयी भेट नाही पावसाची होत हल्ली… या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त

सेच, बाभळीची देहजाळी…ॠतू मनाहून निळा…तेव्हा मलाच माझा…तुला मी पहावे… अशा एकाहून एक सरस कविता यावेळी सादर झाल्या. काळीज का हो… आणि गोठलेल्या काळजाच्या… या ह्रदयस्पर्शी कवितांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा देखील पाणावल्या.

संगीत, संकल्पना, दिग्दर्शन आणि गायन निखील महामुनी यांनी केले, तसेच त्यांना अमिता घुगरी, ॠचा महामुनी, श्रीया महामुनी यांची सहगायनाची आणि अभय गोखले यांच्या सूत्रसंचालनाची साथ मिळाली.

नवीन, चांगले काव्य, उत्तम विचार आणि नवनिमीर्तीचा आनंद देणारे संगीत या कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे निखील महामुनी यांनी सांगितले.